केवळ एक व्यावसायिक म्हणून माझ्या इतर समव्यावसायिक बंधू भगिनींची मदत व्हावी या उद्देशाने हा लेखन प्रपंच.
एका, फक्त व्यवसायालाच वाहिलेल्या समाजातील, व्यक्तीकडून एक व्यावसायिक मर्म शिकलो.
तुम्हाला तुमचे घरगुती खाद्य उत्पादन इतर तशाच उत्पादनांच्या समोर प्रकर्षाने दिसावे असे वाटते का ? जाहिरात बजेट असेल तर त्याकरता तुम्ही तुमच्या उत्पादनाच्या जाहिराती वरती खर्च कराल ना . ? कुठे कुठे आणि कसा खर्च कराल ? नेहमीची TV / Radio जाहिरात माध्यमे , सोशल मीडिया , वृत्तपत्रे आणि मासिके. होर्डिंग, आणि बरेच काही. हो ना ? ही सर्व माध्यमे प्रभावी पण खर्चिक,तात्कालिक आणि औटघटकेची असतात. ज्याला खर्च खूप येतो पण बऱ्याच वेळा तेवढा खर्च करणे शक्य नसते. जाहिरात ही ग्राहकांच्या पर्यंत पोचायला आवश्यकच. वेगळी जाहिरात करायचीच आहे तर जरूर करा. पण अंथरुण पाहून पाय पसरणाऱ्या माझ्या सारख्या व्यावसायिकाला एवढी झेप घ्यायची म्हणली की धडकी भरते.
पण तुमच्या रोजच्या खाद्यउत्पादन, विक्री आणि त्यातून निर्माण होणाऱ्या व्यवसायातून नकळत जर तुमची जाहिरात जर पुढचे अनेक महिने होत राहिली आणि सारखी लोकांच्या नजरेसमोर येतच राहिली तर ? आणि या करता एक रुपया देखील तुम्हाला वेगळा खर्च करावा लागणार नाही. पण तुमच्या रोजच्या उत्पादनाकडे देखील एक जाहिरातीचे माध्यम म्हणून पहा.
कसे ?
तुमचे खाद्यउत्पादन अतिशय उत्कृष्ट आहे. पण त्याचे पॅकिंग का हो इतके साधे ? घरगुती प्लास्टिकची पिशवी आणि त्यावरती स्टिकर ? ! ! थोडा पॅकिंग वरती खर्च अधिक केलात तर जाहिरात नाही का होणार ?
कल्पना करा तुमचे स्वयंपाक घर आहे आणि त्यात विविध कंपन्यांचे मसाले आहेत. पण पूर्वी एक छान चवीचा मसाला आणला आणि घरी आल्याबरोबर लगेच घरच्या डब्यात काढून ठेवला कारण त्याचे पॅकिंग साध्या पिशवीत होते. पण आता त्याचे नावच आठवत नाही.म्हणजे केवळ प्रॉडक्ट चांगले असून देखील पॅकिंग योग्य नव्हते म्हणून ग्राहकाच्या मनातून ब्रँड दिसला नाही. तेच जर पॅकिंग चांगले असते तर तो बॉक्स तसाच राहिला असता आणि पुढच्या वेळेला ग्राहकाने आठवणीने तेच उत्पादन घेतले असते.
तीच गोष्ट बाहेरील carton ची. बाहेरील carton जर तुमच्या स्वतःच्या ब्रॅण्डिंग चे असले तर तोच बॉक्स तुमचे प्रॉडक्ट शेल्फ वरती जाईपर्यंत तुमच्या प्रॉडक्टची जाहिरात करतो. आणि त्या नंतर देखील जर carton / पॅकिंग चांगले असेल तर तोच बॉक्स रिसायकल होऊन परत परत वापरला जातोच म्हणजे पर्यायाने तुमचीच जाहिरात अजून काही दिवस हमखास चालते.
म्हणजे तुमच्या प्रॉडक्टला जी अत्यावश्यक गोष्ट आहे (पॅकिंग) त्याचाच वापर तुम्ही जाहिरात म्हणून करायचा. इंग्लिश मध्ये याला maximum bang for buck म्हणतात. साध्या पॅकिंग पेक्षा थोडा खर्च जास्त येईल पण जाहिरातीचा खर्च कमी होईल ना ? किंवा जाहिरातीचे बजेट अजून जास्त प्रभावी वापरता येईल.
नाही पटत ? एकच उदहारण देतो. (सध्या बाजारात आहे का माहीत नाही).
पूर्वी डालडा वनस्पती चे डबे यायचे. त्यातील उत्पादन वापरून झाले तरी तोच डबा कुठे कुठे आणि कसा कसा वापरला गेला. किती आणि कुठपर्यंत जाहिरात झाली असेल याची कल्पना करा. असे म्हणतात एका चाळीवर बेतलेल्या प्रसिद्ध नाटकाच्या नेपथ्य मध्ये काही उणीव आहे का ? म्हणून विचारले असता गॅलरीच्या बाहेर तुळई वर डालडाच्या डब्यात तुळस ठेवा असे सुचवण्यात आले होते. I rest my case.
मध्यंतरी एक भयानक विडिओ बघितला. झोपडी वजा शेड मध्ये अत्यंत निकृष्ट पद्धतीने, सर्व खाद्य उत्पादनाचे नियम धाब्यावर बसवून, केळ्याचे वेफर निर्मिती चालली होती. सुदैवाने प्रशासनाचे लक्ष तिकडे गेले आणि कारवाई झाली असावी. माझी नक्की खात्री आहे कि आपल्यापैकी कुणीही इतकी हलगर्जी किंवा बेपर्वाई खाद्यान्न निर्माण करण्याच्या बाबतीत नक्कीच करणार नाही.
मग विचार होतो कि याला पायबंद कसा घालता येईल ? केवळ शासकीय किंवा औद्योगिक संस्थांच्या कडून यावरती दक्षता घेतली जाईल हा भाबडेपणा आहे. मग ग्राहकांनीच या वरती उपाय करावा ना ? सुट्टे किंवा unpacked माहीत नसलेल्या दुकानातून असे पदार्थ घेऊ नयेत. त्यामुळे मागणी / पुरवठा या तत्त्वा प्रमाणे असे उत्पादन बंद होईल अशी अपेक्षा करूयात. पण ते होईल तेव्हा होईल.
तोपर्यंत तुम्ही शुद्ध आणि चोख उत्पादन देताय हे कसे सिद्ध करू शकता ?
प्रथमतः तुम्ही तुमचे उत्पादन केवळ तुमच्या उत्पादनाकरीता खास बनवलेल्या वेष्टनात ( पॅकिंग ) मध्येच तुमच्या ग्राहकांना द्यायचे. या मध्ये खर्च थोडा जास्त येईल. पण मागे सांगितल्या प्रमाणे तुमचा ब्रँड निर्माण होईलच पण तुमच्या ग्राहकांना देखील खात्री होईल कि एका नामांकित कंपनीचे आणि सर्व नियमावली पाळून त्या पदार्थाचे उत्पादन झालेले आहे. यातून दुसरा फायदा असा होतो की तुमच्या उत्पादनाची copy सहज होत नाही. म्हणजे कल्पना करा, समजा उद्या तुमचा एखादा ब्रँड / पदार्थ खूप लोकांना आवडला तर तुमची कॉपी करणाऱ्याला तसेच पॅकिंग करावे लागेल आणि तसे जर झाले तर तुम्ही त्या कॉपी करणाऱ्याला सहज शोधू शकाल. किमान कॉपीराईट अथवा तत्सम कायद्यांचे enforcement करणाऱ्या शासकीय संस्थाना त्या कॉपी करणाऱ्याला शोधायला सोपे कराल. एक विचार करा जर तुम्हाला तुमचे पॅकिंग स्वस्त आणि सोप्पे पडत असेल तर तुमची कॉपी करणाऱ्याला देखील तसेच सोप्पे असणार. कुणीही उठून बाजारात जाऊन साधी प्लास्टिकची पिशवी आणि कुठूनतरी ५० / १०० रुपयांचे तुमच्यासारखेच स्टिकर बनवून तुमच्याच नावाने माल विकणार आणि त्याच्या कडून हलगर्जी झाली तर ब्रँड तुमचा खराब होणार. तो दुसरा असाच बळीचा बकरा ब्रँड शोधायला मोकळा. ही लोकं गुन्हेगारच असतात यात संशय नाही. पण चोऱ्या होतातच म्हणुन आपण दक्षता घेत नाही का ?
या मध्ये बारकोड आणि QR कोड ला खूप महत्व आहे. तुमच्या कंपनीचा स्वतःचा बार कोड असला की तुमच्या स्वतःच्या उत्पादन आणि वितरणामध्ये खूप सुसूत्रता येते. पण मुख्य म्हणजे बार कोड घ्यायला जरा खर्च येतो. आता जी कंपनी बार कोड वरती खर्च करते ती नक्कीच दुसऱ्याचे उत्पादन कॉपी करायला एवढा पैसे खर्च करणार नाही. आणि या ‘चलता है’ किंवा ‘ इतना कौन सोचता है ‘ टाईप उत्पादकांना आपोआप चाप बसेल.
आता तुम्ही म्हणाल, ‘ अहो एवढा खर्च करणे परवडत नाही ‘ .
कुणाला ? कुणाला परवडत नाही ? तुम्हाला ? का तुमच्या ग्राहकांना ?
माझ्यामते हे एक अत्यंत चुकीचे कारण आहे. आज भारतामध्ये जो ग्राहक वर्ग आहे तो अत्यंत चोखंदळ आहे. गुणवत्ता आणि शुद्धतेला किंमती पेक्षा जास्त महत्व देतो.
समजा माझ्या समोर जर २ प्रकारची चहाची पत्ती ठेवली.
एक सुट्टी माहीत नसलेली ५० रु किलो आणि एक चांगल्या पॅकिंग / ब्रॅण्डिंग मध्ये असलेली ५५ रु किलो तर मी कुठची घेईन ? मी तरी ५५ रु ची घेईन. कुणी म्हणेल ५० रु किलो ची काही लोकं घेतील. नक्कीच घेतील. पण तेच ग्राहक उदयाला ४० रुपये किलो ची पत्ती मिळाली तर एका क्षणात ते ती घेतील. तुम्हाला असले ग्राहक पाहिजेत का ? तुम्हीच तुमच्या ब्रँडची loyalty निर्माण नाही केलीत तर ग्राहकाकडून तशी अपेक्षा ठेवूच नका.
दर्जा आणि गुणवत्ता उत्तम असेल तर केवळ पॅकिंग ला पैसे जास्त लागतात म्हणून माल घ्यायचे ग्राहक टाळत नाहीत. प्रख्यात मिठाईवाल्यांचीच मिठाई घेताना केवळ पॅकिंगच्या बॉक्सचा खर्च जास्त आहे म्ह्णून त्यांच्या दुकानाच्या पायऱ्या उतरून दुसरीकडे कुणी मिठाई घेते का ?
शिवाय खाद्य पदार्थांचा व्यवसाय हा काही airlines सारखा नाही. तिथे जीवघेणी स्पर्धा आहे.खूप मोठे overheads आहेत. तरी देखील airlines चालतात. काही बंद पडतात. हे व्यावसायिक natural selection / survival of the fittest आहे. Food industry मध्ये देखील भरपूर स्पर्धा आहेच पण प्रत्येक उत्पादकाला स्वतःचा ग्राहक वर्ग निर्माण करायची संधी आहे. तुम्ही तुमचा ब्रँड , तुमचे उत्पादन, तुमच्या व्यवसायाला फिट बनवायला या गोष्टी करणे गरजेचेच आहे. उत्तम दर्जा , शुद्धतेची हमी , सर्व नियम आणि सर्व टॅक्सेस भरून तुमचा व्यवसाय चालू ठेवा. यश नक्की मिळेल. Rome was not built in a day.
तुम्ही कधी जर एखादा सुंदर सोन्याचा दागिना घेतलात तर सोनार तुम्हाला तो वर्तमानपत्रा मध्ये देतो का ? हिऱ्याची अंगठी तुम्हाला प्लास्टिक च्या बॅग मध्ये देतात का ? मोत्यांचा सुंदर हार तुम्हाला साध्या कापडी पिशवीमध्ये मिळतो का ? मग तुमचे उत्पादन, जे तुम्हाला तेवढेच मौलिक आहे..ते देखील तुम्ही तसेच देऊ शकाल ना ?
वरती सांगितल्या प्रमाणे तुम्ही जर स्वतः केळ्याचे वेफर्स बनवत / विकत असाल तर माझी / कुठल्याही ग्राहकाची खात्री कशी पटवाल की तुमचे उत्पादन तसे नाही म्हणून ?
विचार करा ५ / १० रुपये पॅकिंग चे वाचवणे महत्वाचे का तुमचा ब्रँड / व्यवसाय ?
शेवटी तुमचा ब्रँड , तुमचा माल आणि सर्वात महत्वाचा तुमचा ग्राहक याची काळजी तुम्हीच घ्यायचीये.
तुमच्या सारखाच मी एक सामान्य व्यावसायिक आहे आणि इतके दिवस मी देखील पॅकिंग फेकूनच द्यायचे असते मग त्यावर कशाला खर्च करा असा विचार करत होतो. कुणाच्याही प्रॉडक्टला मला हीन मुळीच लेखायचे नाहीये. माझा व्यवसाय पॅकिंग किंवा त्याशी संलग्न सेवेशी निगडीत नाही. एक विचार पटला तोच इतर समव्यावसायिक बंधू भगिनींच्या समोर मांडावासा वाटला. इतकेच.
रसिक कुलकर्णी
माझा हा लेख माझ्या नावासह अग्रेषित (Forward) करायला माझी परवानगी आहे.